कल्पना दत्त (जन्म – २७ जुलै १९१३; मृत्यु: ८ फेब्रुवारी १९९५)


भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महिलांचे योगदानहि तसुभरही कमी नाही क्रांती दिनाच्या जागराच्या निमित्ताने अशाच काही अपरिचीत महिलांच्या कर्तुत्वाचा अल्पसा परिचय करून देण्याचा हा छोटा प्रयत्न.


कल्पना दत्त यांचा जन्म २७ जुलै १९१३ रोजी, चितगाव (चटगाव) गाव (आता बांग्लादेशमध्ये) च्या श्रीपूर गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. चितगाव येथे मेट्रिकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढच्या शिक्षणासाठी बेथुन महाविद्यालय (विज्ञान शाखा) कोलकाता येथे प्रवेश घेतला. प्रसिद्ध क्रांतिकारकांची चरित्रे वाचून त्या पुष्कळ प्रभावित झाल्या आणि आपण स्वत: देखील क्रांती लढ्यात सामील होऊन काहीतरी योगदान द्यावे अशी इच्छा त्यांच्या मनात येवू लागली.

कोलकाता इथे त्या “छात्री संघ” मध्ये सक्रीय झाल्या. छात्री संघ हा छोटा क्रांतिकारी गट होता. तिथे त्यांची ओळख प्रीतीलता वाडेकर आणि बिना दास यांच्याशी झाली. प्रीतीलता वाडेकर यांनीच कल्पनाची ओळख चटगाव चे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक सूर्यसेन ज्यांना मास्टर दा सूर्यसेन यांच्याशी करून दिली. सूर्यसेन यांची कल्पनाला आपल्या गटात घेण्याची इच्छा नव्हती पण कल्पनाच्या आत्यंतिक देशभक्तीने मास्तर दा सूर्यसेन यांना प्रभावित केले आणि कल्पना सूर्यसेन यांच्या गटाची सक्रीय सदस्य बनू शकली. कल्पनांवर गटाला दारुगोळा, बारूद व इतर वस्तू पुरवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.


१८ एप्रिल १९३० ला मास्टर सूर्यसेन यांनी अजय घोष,कल्पना दत्त, तारकेश्वर दस्तिदार, कणेश घोष,प्रीतिलता वाडेकर इ. शेकडो क्रांतिकारकांनी चितगाव येथील सरकारच्‍या शस्‍त्रागारांवर हल्‍ला केला. सूर्यसेन यांनी स्थापन केलेल्या “इंडियन रिप्ब्लिक आर्मीने” यांनी या कटाची योजना तयार केली होती. १८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील दोन शस्‍त्रागारांतील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलिफोन व टेलिग्राफ व रेल्वे यंत्रणा तोडून टाकली. हा हल्ला चितगाव चा विद्रोह म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांबरोबर झालेल्या चकमकीत चितगावमध्ये ब्रिटिश फौजेचा प्रतिकार करणे शक्य नसल्याने सूर्यसेन व त्यांच्या सहकार्‍यांनी चितगावजवळील जलालबाद टेकडीचा आश्रय घेतला. तिथे क्रांतिकारी आणि इंग्रज यांच्यात चांगलीच चकमक झाली. हा हल्ला इंग्रजांच्या सार्वभौमत्वावरील हल्ला होता. इंग्रज सैनिकांनी कित्येक निष्पाप तरुणांवर वर गोळीबार करून त्यांना ठार मारले.

कल्पना दत्त गन कॉटन बनवण्यात तरबेज होत्या. दरम्यान त्यांनी बंदूक चालविणे आणि नेमबाजीचा हि अभ्यास केला होता. त्यांनी गुप्तपणे गन कॉटन बनवले होते. ज्या न्यायालयात क्रांतीकारींच्या विरोधात खटले चालत त्या न्यायालयाची इमारत आणि कारागृहाची भिंत डायनामाईटने उडवून देण्याची अत्यंत धाडसी योजना त्यांनी आखली पण पोलिसांना या बेताचा सुगावा लागला आणि त्यामुळे हि योजना अमलात आणता आली नाही. पुरुषी वेशात फिरणाऱ्या कल्पनाला अटक करण्यात आली पण पुराव्या अभावी सोडून देण्यात आले पण कल्पनाच्या घरावर पहारे बसविण्यात आले. पण पोलिसांना चकमा देऊन त्या मास्तर सूर्यसेन यांना भेटत असत.

चितगाव घटनेचा प्रतिशोध म्हणून सप्टेंबर १९३१ मास्टर सूर्यसेन यांनी युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची योजना आखली आणि त्या योजनेच्या अंमलबजावणीची जोखीम कल्पना दत्त आणि प्रीतीलता वाडेकर यांच्यावर सोपवली. हल्याच्या एक आठवड्यापूर्वी पुरुषी वेशात टेहळणी करणाऱ्या कल्पनाला पोलिसांनी अटक केली व जेल मध्ये टाकले. प्रीतीलता वाडेकर यांनी युरोपियन क्लबच्या हल्ल्याची अंमलबजावणी केली आणि अटक टाळण्यासाठी सायनाईड खाऊन आत्महत्या केली. हि बातमी कल्पना यांना जेल मध्ये कळली हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता त्यांनी खूप जवळची मैत्रीण गमावली होती.
या घटनेनंतर विनाशर्त जामिनावर सुटका झाल्यावर कल्पना दत्त, सूर्यसेन यांच्या बरोबर भूमिगत झाल्या. १७ फेब्रुवारी १९३३ मध्ये गटातील एकानेच त्यांच्या व सूर्यसेन यांच्या ठिकाणाची माहिती इंग्रजाना दिली. कल्पना दत्त आणि त्यांचे इतर सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाले परंतु सूर्यसेन यांना अटक झाली व त्यांचे अतिशय हाल करून त्यांना १२ जानेवारी १९३४ रोजी फाशी देण्यात आली.
१९ मे १९३३ ला कल्पना दत्त यांना अटक करण्यात इंग्रजांना यश आले आणि त्यांना चितगाव शस्त्रागार लुट या केस दुस-या सुनावणी(second supplementary Trial) मध्ये आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली त्यावेळेस त्यांचे वय फक्त २१ वर्ष होते. त्यानंतर १९३९ मध्ये महात्मा गांधी आणि रवीन्द्रनाथ टैगोर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे त्याची सुटका झाली.
त्यांनी १९४० मध्ये कोलकाता विद्यापीठातून त्यांनी आपले उर्वरित शिक्षण पूर्ण केले. नंतर त्या कम्युनिस्ट पार्टीत सामील झाल्या व इंग्रजानविरुद्धचा लढा चालूच ठेवला. १९४३ मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस पुरण चंद जोशी यांच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांना चंद जोशी आणि सुरज जोशी अशी दोन मुले आहेत. त्या सुमारास त्या चितगाव ला परत गेल्या आणि कम्युनिस्ट पार्टीच्या शेतकरी व महिला आघाडीवर काम करू लागल्या. तसेच १९४३ मधील बंगालच्या दुष्काळाच्या वेळेस व बंगलाच्या फाळणीच्या वेळी त्यांनी मदत कार्यकर्ता म्हणून काम केले. १९४५ मध्ये त्यांनी “Chittagong Armoury Raiders: Reminiscences” हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले. १९४६ मध्ये त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्य म्हणून बंगाल विधानसभेची निवडणूक लढवली परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही. १९४७ मध्ये त्या भारतात परत आल्या व त्यांनी निवृत्ती पर्यंत भारतीय सांख्यिकी संस्था आणि 'इंडो सोवियत सांस्कृतिक सोसायटी' यांच्यासोबत काम केले.

त्यांची सून, चंद जोशी यांच्या पत्नी मानिनी चॅटर्जी यांना आपल्या निधनापूर्वी चितगाव विद्रोहाच्या प्रत्येक घटनेची तपशीलवार माहिती दिली, त्याच प्रेरणेतून मानिनी चॅटर्जी यांनी “ Do or Die” हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक फक्त चितगावच्या विद्रोहाची कहाणी नाही पण त्यात तरुण स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि त्यांचा शूर नेता सूर्यसेन यांच्या त्यागाची, संघर्षाची व बलाढ्य अशा ब्रिटीश साम्राज्य विरुद्ध एकहाती लढतीची कहाणी आहे. चितगाव विद्रोहातील खूप कमी सदस्य जिवंत राहू शकले, कल्पना दत्त त्यापैकीच एक, कदाचित या विद्रोहाची ज्वाला ,धग आणि या सगळ्यांचे देशप्रेम आपल्या पिढी पर्यंत पोहचावे म्हणूनच नियतीने त्यांची निवड केली असावी. सप्टेंबर १९७९ त्यांना पुणे येथे “वीर महिला” या किताबाने सन्मानित करण्यात आले.
कल्पना दत्त आणि चितगाव चा विद्रोह या वर २०१० व २०१२ मध्ये अनुक्रमे “ खेले हम जी जान से (Khele Haum Ji Jaan Se)” आणि चितगाव Chittagong हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. दुर्दैवाने दोन्ही सिनेमे विशेष प्रसिद्ध झाले नाहीत पण निश्चितच या दोन्ही अप्रतिम कलाकृती आहेत.


८ फेब्रुवारी १९९५ रोजी कल्पना दत्त यांनी कोलकाता येथे आपला देह ठेवला आणि एक क्रांतीज्योती अनंतात विलीन झाली आपण त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन आपल्या अंतरंगात क्रांतीज्योत पेटवूया.
#आझादी_के_दिवाने
#जागर_क्रांतीचा
#जागर इतिहासाचा
www.ipoonam.in

अवंतीबाई लोधी – (जन्म १६ ऑगस्ट १८३१ - मृत्यू २० मार्च १९५८) १८५७ च्या समरातील एक विस्मृतीतील गेलेलं मानाच पान


 अवंतीबाई  लोधी१८५७ च्या समरातील एक विस्मृतीतील गेलेलं मानाच पान

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मेरठ येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी अशा इतर नावांनीही ओळखला जातो.

जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. याच समरात आपली समशेर गाजवणार्या एक अद्भुत वीरांगना अवंतीबाई  लोधी ह्या लोधी समाजात मर्यादित होऊन राहिल्या आहेत. तत्कालीन अथवा आधुनिक इतिहासकारांनी त्यांच्या कर्तुत्वाची दखल का घेतली नाही याची कारणे समजणे कठीण आहे म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी त्यांचा हा अल्पपरिचय त्यांना अभिवादन म्हणून.

अवंतीबाई  लोधी यांचा जन्म १६ ऑगस्ट १८३१ साली  मध्यप्रदेशातील त्या काळी सिवनी जिल्ह्यातील व आता जबलपूर जिल्ह्यात असणाऱ्या मनकेड़ी या गावी झाला. मनकेडी हे नर्मदा किनाऱ्यावरील एक छोटेसे सुंदर गाव आहे. अवंतीबाईंचे वडील जुंझार सिंह हे १८७ गावांचे जमीनदार होते. अवंतीबाईंचे सर्व बालपण मनकेडी या गावी गेले. त्यांच्या वडिलांनी अवंतीबाईना एखाद्या मुलाप्रमाणेच घोड्यावर बसणे, तलवार चालवणे इत्यादीचे प्रशिक्षण दिले होते व अवंतीबाई यात तरबेज होत्या. जमीनदाराच्या घरात जमीनदारापुत्रापणे अवंतीबाईचे पालनपोषण झाले असल्याने लहानपणापासूनच त्या साहसी व शूर होत्या, त्यांना शिकारीचीहि आवड होती.

उपवर झाल्यावर आपल्या साहसी कन्येची वृत्ती आणि गुण लक्षात घेऊन जुंझार सिंह यांनी अवंतीबाईंचा विवाह स्वजातीतील लोधी राजपूत रियासतीच्या राजकुमाराशी करायचे ठरवले परंतु गढमंडलाचे गोड वंशी राजे राजा शंकर शाह यांच्या हस्तक्षेपामुळे जुंझार सिंह यांनी अवंतीबाईंचा विवाह रामगढचे राजा लक्ष्मण सिंह यांचा मुलगा विक्रमजीतसिंह यांच्याशी लावून दिला. १८४९ साली शिवरात्रीच्या दिवशी विक्रमजीत सिंह व अवंतीबाई लोधी यांचा विवाह झाला . हि तिथी जर महाशिवरात्री असेल तर हा विवाह १८ जुलै १८४९ साली झाला असे होईल, पण तसा स्पष्ट उल्लेख सापडत नाही.

रामगढ राज्याची स्थापना इ.स. १६८० मध्ये गज सिंह लोधी यांनी केली, या विवाहाच्या वेळी रामगढचे राज्य ४००० वर्ग मील इतके पसरले होते. त्यात प्रताप गढ़मुकुटपुररामपुर,शाहपुरशहपुरानिवासरामगढ़चौबीसामेहदवानी और करोतिया असे दहा परगणे, ६८१ गावे होती ज्यांच्या सीमा सोहागपूर, अमरकंटक, चबुतरा पर्यंत पसरलेल्या होत्या.

सन् १८५० मध्ये रामगढ़चे राजा, अवंतीबाईंचे सासरे, राजा लक्ष्मण सिंह मृत्यु पावले आणि त्यांचे पती राजकुमार विक्रमजीत राजगादिवर बसले. राजा विक्रमजीत सिंह अतिशय धार्मिक प्रवृत्तिचे होते आणि धार्मिक कार्यांमध्ये  आपला जास्ती जास्त वेळ व्यतीत करत असत. काही काळानंतर ते अर्धविक्षिप्त झाले.

अवंतीबाईंना दोन अपत्ये होती, अमान सिंह आणि शेर सिंह. दोघेही लहान असल्यामुळे राज्य कारभाराची जबाबदारी  अवंतीबाईंवर आली. अवंतीबाईंनी आपले विक्षिप्त पति अल्पवयीन मुलगा  अमान सिंह यांच्यावतीने राजकारभार पाहायला सुरवात केली.

सन १८४८ मध्ये जनरल लार्ड डलहौजीची नियुक्ती भारताचा गवर्नर म्हणून झाली. तो अत्यंत साम्राज्यवादी असल्याने त्याने भारतामध्ये इंग्रंजांचे साम्राज्य वाढवण्यासाठी अनेक उपाय शोधून काढले. त्यापैकी एक म्हणजे राज्याची योग्य व्यवस्था नसल्यास राज्ये/संस्थाने खालसा करणे. या धोरणा अंतर्गत कंपनी सरकार ज्या ज्या राज्याचा उत्तराधिकारी किंवा वारस नाही बहुतेक त्या त्या राज्याला कंपनीच्या शांसनात ब्रिटिश साम्राज्य विलीन करून घेत. पण हि मूळ संकल्पना डलहौजीची नव्हती. पण मूळ धोरणात आपल्याला हवे तसे बदल करून त्याने भारतातील संस्थानिकांची राज्ये हडपण्याची नीती त्याने अवलंबली. याच धोरणा अंतर्गत डलहौजीने कानपुरझाँसीनागपुरसताराजैतपुरसम्बलपुर राज्ये हडप केली होती.

अवंतीबाईंच्या राजनैतिक परिस्थितिची माहिती मिळताच त्याने १३  सप्टेंबर १८५१ला  कोर्ट ऑफ वार्डस’ च्या अंतर्गत रामगढचे राज्य खालसा करुन त्याची व्यवस्था लावण्यासाठी शेख मौहम्मद नावाच्या तहसीलदाराची नियुक्ती केली.  व लोधी राज परिवारास  पेन्शन देउ केली. या घटनने अवंतीबाईंना अतिशय दुःख झाले, हा अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. अतिशय परिश्रम पूर्वक त्यांनी हा अपमान पचवला परंतु इंग्रजांपासून आपल्या राज्याला स्वतंत्र करण्याचा निश्चय त्यांनी केला.  

मे १८५७ मध्ये अवंतीबाईंचे पती राजा विक्रमजीत सिंह यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान १० मे १८५७ साली मेरठ मध्ये ब्रिटीश सरकारच्या लष्करात असलेल्या भारतीय शिपायांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केला.  मेरठचे कोतवाल धन सिंह गुर्जर यांच्या नेतृत्वाखाली मेठचे पोलीस,  शहरी आणि ग्रामीण जनतेने क्रांतीचा  शंखनाद केला. दुसऱ्याच दिवशी दिल्लीमध्ये मुघल बादशाह बहादुरशाह जफरला  विद्रोही सैनिकांनी भारताच्या क्रांतीकारी सरकारचा शासक घोषित केले.  मेरठ आणि दिल्लीच्या या  घटना सगळीकडे  आगीसारख्या पसरल्या आणि संपूर्ण देशात आंदोलनाची एकच लाट उसळली.  

या उठावाचे संकेत जानेवारीपासूनच जबलपूर आणि मंडला क्षेत्रात मिळत होते. छोट्या छोट्या चीठ्ठ्यानद्वारे अतिशय गुप्तपणे काही भयंकर संकटाचा सामना करण्याचे संदेश गावो गावी पसरवले जात होते. मे महिन्याच्या प्रारंभी तूप, पीठ आणि साखरेमध्ये अनुक्रमे डुकराची चरबी, रक्त आणि हाडांचा चुरा सरकारच्या आदेशाने मिसळला जातो अश्या वंदता पसरल्या होत्या. त्यामुळे इंग्रज सरकारचा उद्देश धर्म भ्रष्ट करणे आहे असा समज सर्वत्र पसरला होता.

मध्यभारतातील अनेक शासक, राजे हे कानपूर मध्ये नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्या सतत संपर्कात होते. तसेच इथला शेतकरी वर्ग आणि इंग्रजांच्या सैन्यात असलेले भारतीय सैनिक त्यांच्या नेतृत्वाखाली संघटीत होऊ पाहत होते.

उठावाच्या जबलपूर क्षेत्रात ऐतदेशीय राजे, जमीनदार आणि जबलपूर, सालीमानाबाद आणि पाटणा येथे तैनात असलेल्या ५२ रेजिमेंटच्या सैनिकांनी एक गुप्त योजना आखली. या योजनेत गढ़मण्डलाचे पूर्व राजा शंकर शाहत्यांचा मुलगा रघुनाथ शाहरामगढ़च्या राणी अवंतीबाई लोधीविजयराघवगढ़चे राजा सरयु प्रसादशाहपुरचे मालगुजार ठाकुर जगत सिंह,सुकरी-बरगीचे ठाकुर बहादुर सिंह लोधी,  हीरापुरचे मेहरबान सिंह लोधी आणि देवी सिंह सहभागी होते. त्यांच्या सोबत सोहागपुरचे जागीरदार गरूल सिंहकोठी निगवानी चे ताल्लुकदार बलभद्र सिंहशहपुराचे  लोधी जागीरदार विजयसिंह आणि मुकासचे खुमान सिंह गोंड विद्रोह पण सहभागी होते तसेच रीवाचे राजा रघुराज सिंह हे हि उठाव कर्त्यांना पाठींबा देत होते. वयोवृद्ध ७० वर्षीय राजा शंकर शाह यांची उठाव कर्त्यांनी मध्यभारतातील क्रान्ति नेता म्हणून निवड केली.

राणी वंतीबाईनी या क्रांती संघटनेच्या बांधणी मध्ये अतिशय महत्वपूर्ण सहभाग घेतला. क्रांती संदेश मध्यभारतातील गावोगावीच्या शेतकरी  देशी सैनिकजमीनदार यांना पाठवण्यासाठी अवंतीबाईनी स्वतःच्या हाताने पत्रे लिहिली होती तीत खालील ओळी लिहलेल्या असत.

देश और आन के लिए मर मिटो
या फिर चूडियाँ पहनों।
तुम्हें धर्म और ईमान की
सौगन्ध जो इस कागज
का पता दुश्मन को दो |

सप्टेंबर १८५७ मध्ये या क्रांतिकारी संघटनेने त्या क्षेत्रातील राजे आणि जमीनदारांच्या मदतीने सैन्याची उभारणी करून मोहरमच्या पहिल्या दिवशी सरकारच्या छावणीवर हल्ला करायचा अशी योजना बनवली. गिरधारीदास नावाच्या एका गद्दाराने या कटाची बातमी इंग्रजाना दिली. इंग्रजांनी एका शिपायाला फकिराच्या वेशात राजा शंकर शाह यांच्याकडे पाठवले. त्याने  राजांच्या सरळ स्वभावाचा फायदा घेऊन हि गुप्त योजना माहिती करून घेतली.

१४ सप्टेंबर १८५७ रोजी लेफ्टिनेन्ट क्लार्कने राजा शंकर शाहआणि त्यांचा मुलगा पुत्र रघुनाथ शाह वत्यांच्या कुटुंबातील परिवारातील १३ जणांना अतिशय सहजपणे त्यांच्या जबलपूरमधल्या हवेली मधून अटक केली. या हवेलीत त्यांना काही गुप्त कागदपत्रे तसेच इंग्रजी शासन उलथून टाकण्यासाठी आपल्या आराध्य देवतेला केलेल्या प्रार्थना केलेला कागद सापडला. दोन्ही पिता पुत्रांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि अटकेपासून अवघ्या चार दिवसात १८ सप्टेंबर १८५७ ला त्यांना तोफेच्या तोंडी दिले गेले. या राजा शंकर शाह आणि रघुनाथ शाह यांच्या बलिदानामुळे भारतात विद्रोहाची भावना अजुनच तीव्र झाली. त्याच रात्री भारतीय सैन्य तुकडीच्या ५२व्या तुकडीने जबलपूरमध्ये उठाव केला लवकरच हि विद्रोहाची भावना  पाटण आणि सालीमानाबाद या छावण्यामध्ये पसरली.

पण या घडीला राजा शंकर शाह यांच्या मृत्युनंतर संघटनेच्या उठावाकडे सक्षम नेतृत्व नव्हते व त्यांना सक्षम नेतृत्वाची गरज होती. मध्य भारतातील जनता, शेतकरी वर्ग , सैनिक हे राणी अवंतीबाईंच्या साहसी आणि  युध्याप्रिय स्वभावाशी परिचित होते. विशेषतः राणी अवंतीबाईचे रामगढच्या शेतकऱ्यांशी अत्यंत चांगले संबंध होते तसेच त्यांच्या राज्यातील जनता त्यांच्यावर प्रेम करत होती. तसेच त्या भागातील त्यांनी केलेल्या क्रांती प्रसाराच्या कामाचे महत्व ओळखून उठाव कर्त्यांनी आपल्या संघटनेचे नेतृत्व राणी अवंतीबाईना दिले आणि इथून त्यांचा क्रांतिकारी नेता म्हणून प्रवास सुरु झाला. विजयराघवगढ़ चे राजा सरयू प्रसादशाहपुर चे मालगुजार ठा० जगत सिंहसुकरी-बरगी चे ठा० बहादुर सिंह लोधी आणि हीरापुर के महरबान सिंह लोधी यांनी पण अवंतीबाईच्या नेतृत्वाचे समर्थन केले.

क्रांतीचे नेतृत्व स्वीकारल्या नंतर लगेच राणीने रामगढ़ मध्ये  ब्रिटिश सरकारने नियुक्त केलेल्या तहसीलदाराला हाकलून दिले आणि रामगढची शासन व्यवस्था आपल्या हातात घेतली. राणीच्या या विद्रोहाची बातमी जेव्हा जबलपुरच्या कमिश्नरला कळली तेव्हा त्याने राणीला मण्डलाच्या  डेप्युटी कलेक्टरला येऊन भेटण्याचा आदेश दिला. पण पदाधिकार्यांना भेटण्या ऐवजी राणीने युद्धाची तयारी सुरु केली. त्यांनी रामगढ़च्या किल्ल्याची डागडुजी करून त्याला मजबूत बनवले.  मध्यभारताचे  विद्रोही उठावकर्ते राणीच्या नेतृत्वा खाली एकजुट होऊ लागले.

जबलपुरच्या तत्कालीन कमिश्नर ने आपल्या अधिकार्यांना विद्रोहाची माहिती देताना लिहिले आहे कि  राजा शंकर शहा यांच्या  मृत्यु मुळे क्रुद्ध आणि अपमानित झालेलले ४००० विद्रोही रामगढ़च्या विधवा राणी अवंतीबाई तथा युवक राजा सरयू प्रसाद यांच्या  नेतृत्वाखाली  नर्मदा नदी च्या  उत्तरी क्षेत्रामध्ये  सशस्त्र विद्रोहा साठी एकत्रित झाले आहेत.  राणी  अवंतीबाईने आपल्या सहकार्यांच्या साथीने हमला करून घुघरीरामनगरबिछिया इत्यादि ठिकाणी इंग्रजांना पराजित केले आहे.

खेरीचे युद्ध (२३ नोव्हेंबर १८५७)
यानंतर राणीने मण्डला वर  आक्रमण करण्यासाठी मण्डला पासून एक किलोमीटर पृवेकडे असणाऱ्या खेरी गावात सशक्त सेनेची  मोर्चेबांधणी केली. राणीच्या आक्रमणाची माहिती मिळताच शहपुरा आणि मुकासचे जमींदार राणीच्या मदतीला आले. इथे इंग्रज आणि क्रांतिकारी यांच्यात घमासान युद्ध झाले मंडलाचा डेप्युटी कमिशनर वाडिंग्टन याने आपली सर्व शक्ती पणाला लावली पण शेवटी काही एक उपाय न चालल्याने तो सिवनीला पळून गेला. या युद्धामुळे मंडला शहर सोडून पूर्ण मंडला जिल्हा आणि रामगढ स्वतंत्र झाले. या विजयामुळे क्रांतीकारींचा उत्साह वाढला होता. या  घटना नंतर रानी अवंतीबाईनी डिसेंबर १८५७ ते फेब्रुवारी १८५८  पर्यंत मण्डला वर शासन केले.

कैप्टन वाडिंगटन हा खूप कालावधी पासून मण्डला चा  डेप्युटी कमिश्नर होता त्याने आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आणि आपली गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी मार्च १८५८ ला लेफ्टीनेन्ट बार्टनलेफ्टीनेन्ट कॉकबर्न यांच्या समवेत रामगढच्या दिशेने कूच केले. त्यांनी विजयराघवगढ़ जिंकले. विजय राघवगढ़चे राजा सरयू प्रसाद फरार झाले.१५ जानेवारी १८५८ ला त्यांनी पुन्हा घुघरीवर नियंत्रण मिळवले.  लगेचच त्यांनी नारायणगंजपाटनसलीमानाबाद मध्येही क्रांतीकारींचा पराभव केला आणि  ते रामगढ ला पोहचले.

इंग्रजी सैन्याने रामगढ़च्या  किल्यावर दोन्ही बाजूने आक्रमण केले. एका बाजूने लेफ्टीनेन्ट बार्टन लेफ्टीनेन्ट कॉकबर्न चे नागपुर इन्फैन्ट्रीचे सैनिक आणि दुसर्या बाजूला स्वतः कैप्टन वाडिंगटन  ५२ वी नेटिव इन्फैन्ट्री चे सेनिकों असा हल्ला चढवला.  राणी अवंतीबाईंच्या सैन्यात असणारे सैनिक व शेतकरी सामील होते त्यांनी इंग्रजांच्या हल्ल्याला जोरदार प्रतिउत्तर दिले. परंतु इंग्रजी सैनिकांची संख्या व युध्यासामग्री हि राणीच्या तुलनेत कितीतरी पट अधिक होती. शेवटी राणीने किल्ल्याबाहेर पडून देवहरगढ़च्या पर्वतीय प्रदेशाचा व घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन गनिमी कावा आरंभला.

राणीने रामगढ़ सोडल्यानंतर इंग्रजी सेनेने  रामगढ किल्ल्यात प्रवेश मिळवला व पूर्ण किल्ला उध्वस्त केला. देवहरगढ़च्या जंगलांमध्ये राणीने आपले विखुरलेले सैन्य पुन्हा एकत्र केले तिला रीवाच्या राजाचे सहाय्य अपेक्षित होते पण त्यांनी इंग्रजांना मदत करण्यात धन्यता मानली व तो इंग्रजांच्या मदतीला गेला. देवहरगढ़च्या  जंगलात भयंकर युद्ध झाले ज्यात राणी आणि राणीच्या सैन्याला इंग्रजांनी चारी बाजूने घेतले. क्रांतिकारी आणि इंग्रज यांच्यात निर्णायक युद्ध पेटले. राणीचे अनेक सैनिक मारले गेले राणी घायाळ झाली होती आणि त्यांनी राणी दुर्गावतींचे अनुकरण करत इंग्रंजांच्या हाती पडण्या ऐवजी २० मार्च १८५८ रोजी स्वत:ची तलवार आपल्या पोटात खुपसून घेऊन आत्मबलिदान केले.

राणी अवंतीबाई या अत्यंत साहसी, चाणाक्ष राज्यकर्त्या होत्याच पण त्या अतिशय उत्कृष्ट नेता व युद्धकुशल सेनापती होत्या. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर संकटकाळात ज्या धैर्याने त्यांनी इंग्रजांचा सामना केला तसेच ज्या नेतृत्व गुणामुळे त्यांनी क्रांतीकारांचे नेतृत्व करत क्रांतीचा धगधगत ठेवला  आणि इंग्रजांना काठोर आव्हान दिले ह्याची दखल घेणे आवश्यक ठरते.

आज दुर्दैवाने त्यांचे जन्मतिथी व पुण्यतिथी लोधी समाजापुरत्या मर्यादित साहिल्या आहेत . पण त्यांचे भारताच्या पहिल्या स्वत्तात्र्या संग्रमाले योगदान हे इतर क्रांतीकारीप्रमाणे उल्लेखनीय आहेच. का कुणास जाणे पण इतिहासाने याची यथोचित दाखल घेतली नाही म्हणूनच त्यांच्या जन्मदिवशी त्यांना हे विनम्र अभिवादन.